नवी दिल्ली: ढोल-ताशांचा दणदणाट, ‘गणपती बाप्पा मोरया’चा गगनभेदी जयघोष आणि भक्तीभावाने ओथंबलेले वातावरण… महाराष्ट्राच्या समृद्ध आणि वैभवशाली सांस्कृतिक परंपरेची ही मंगलमयी अनुभूती देशाची राजधानी नवी दिल्लीत पाहायला मिळाली. येथील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक रीतीरिवाजांनुसार गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते महाआरती
या मंगल सोहळ्यात भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपस्थित राहून बाप्पाचे विधिवत पूजन केले व महाआरती केली. उपराष्ट्रपतींनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भारतातील मॉरिशसच्या उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बाप्पू, अपर मुख्य सचिव (कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता) मनीषा वर्मा, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल, गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक सारिका शेलार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात निघाली भव्य मिरवणूक
गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी सकाळी कोपर्निकस मार्गावर ढोल-ताशांच्या गजरात अतिशय दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांमुळे राजधानीच्या रस्त्यांवर मराठमोळा माहोल तयार झाला होता. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीनंतर महाराष्ट्र सदनात वैदिक मंत्रोच्चारात गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
सध्या जगभरात गणेशोत्सवाचा डंका वाजत असून, महाराष्ट्राचा गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. याच संस्कृतीचे प्रतिबिंब दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पाहायला मिळत आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सदनामध्ये विविध मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राची ओळख असणारी लावणी, लोकनृत्य, नाटक, संगीत मैफल, झांज पथकांचे वादन, कीर्तन आणि भजनसंध्या यांसारख्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश आहे.
केवळ राजधानी दिल्लीतच नव्हे, तर सातासमुद्रापार देखील महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गजर होत असून लवकरच दुबईत रंगणार महाराष्ट्राच्या लोककलेचा गजर पाहायला मिळणार आहे. दिल्लीतील या उत्सवामुळे दिल्लीस्थित मराठी बांधवांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.