मुंबई: कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) च्या वापरात महाराष्ट्र संपूर्ण देशात अव्वल स्थानावर आहे. या सीएसआर निधीच्या प्रभावी वापरामुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगमामुळे महाराष्ट्रात प्रगतीचा एक नवा अध्याय लिहिला जात आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हॉटेल प्रेसिडेंट येथे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक महा इम्पॅक्ट’ (Tech Maha Impact) परिषदेत ते बोलत होते.
या महत्त्वपूर्ण परिषदेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महा आयटीच्या आयुक्त भुवनेश्वरी एस. आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शासकीय योजना आणि सीएसआरचा मिलाफ: ‘गुणाकार प्रभाव’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, देशात दरवर्षी सुमारे ३६ हजार कोटी रुपयांचा सीएसआर निधी खर्च होतो, ज्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, हा निधी केवळ मुंबई किंवा पुणे यांसारख्या मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
‘व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्ह’ (VSTI) अंतर्गत कॉर्पोरेट भागीदारांच्या मदतीने महाराष्ट्रातील तब्बल १,००० गावांचा कायापालट करण्यात आला आहे. जेव्हा शासकीय यंत्रणेची व्याप्ती आणि खाजगी क्षेत्रातील लवचिकता व तंत्रज्ञान एकत्र येतात, तेव्हा सामाजिक क्षेत्रात ‘गुणाकार प्रभाव’ (Multiplier Effect) दिसून येतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्राचे आर्थिक सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान
महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन असून राज्यात सातत्याने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. नुकतीच महाराष्ट्रात ६.५ लाख कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक झाली असून, त्यासोबतच आता सीएसआर निधीच्या माध्यमातूनही राज्याच्या कानाकोपऱ्यात विकास पोहोचवला जात आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाल्या की, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचा खरा उद्देश सामान्य माणसाचे जीवन सुकर करणे हाच असायला हवा. केवळ पदवी पुरेशी नसून आजच्या तरुणांना कौशल्याची जोड देणे आवश्यक आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सामाजिक मूल्यांची जोपासना करावी, या विचारांना प्राधान्य देत ग्रामीण भागातील महिला आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे बळ दिल्यास राज्याचे चित्र नक्कीच बदलेल. यावेळी त्यांनी बारामतीमध्ये कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) आधारे सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती दिली.
२४ आघाडीच्या कंपन्यांसोबत करार; १५५ कोटींचा निधी
माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, तंत्रज्ञानाचा वापर केवळ व्यावसायिक कामांसाठी न करता सामान्य जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. या परिषदेत राज्यातील विविध विकासकामांसाठी देशातील २४ आघाडीच्या कंपन्या आणि संस्थांसोबत सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले आहेत. या माध्यमातून महाराष्ट्राला सुमारे १५५.७५ कोटी रुपयांचे योगदान मिळणार असून, हा निधी थेट लोकोपयोगी कामांसाठी वापरला जाणार आहे.
‘एआय’ (AI) क्रांतीसाठी महाराष्ट्र सज्ज!
महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, जीएसटी संकलन, थेट परदेशी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात येणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्रांतीचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र पूर्णपणे सज्ज आहे. शासकीय प्रकल्पांना गती देण्यासाठी सीएसआर हा अत्यंत सोपा आणि वेगवान पर्याय ठरत आहे.
या निमित्ताने, सीएसआर निधी देणारे दाते आणि गरजू घटक यांच्यात समन्वय साधण्यासाठी एका विशेष ‘सीएसआर वेब पोर्टल’चे अनावरण करण्यात आले. या पोर्टलमुळे निधीचा विनियोग अत्यंत पारदर्शक पद्धतीने करणे शक्य होणार आहे.