गणेशोत्सव हा अवघ्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून जाहीर केल्याने या पर्वाचा उत्साह राज्यभरात द्विगुणीत झाला आहे. मात्र, हा आनंदोत्सव साजरा करताना कायदा, सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचे भान राखणे अत्यंत आवश्यक आहे.
आपल्या भक्तीमुळे अथवा आनंदामुळे निसर्गाला हानी पोहोचणार नाही आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, अशा शिस्तबद्ध व पर्यावरणस्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे.
राज्य महोत्सवातून पर्यावरणपूरकतेचा व्यापक संदेश
गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ घोषित केल्यानंतर राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, पर्यावरण विभाग आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा या उत्सवाला अधिक नियोजनबद्ध बनवण्यासाठी एकत्र आल्या आहेत. महाराष्ट्राची लोककला, संस्कृती आणि वैभव राज्याबाहेर पोहोचवण्यासाठी विविध शहरांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी शाडू मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना प्रोत्साहन, हस्तकला प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत. नुकताच नवी मुंबईत १० हजार विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून बाप्पा घडवत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता, ज्यातून राज्यभरातील तरुणाईला पर्यावरण रक्षणाची नवी प्रेरणा मिळाली.
शाडूच्या मूर्ती आणि जलस्रोतांचे रक्षण
प्लॅस्टर ऑफ पॅरिस (PoP) आणि रासायनिक रंगांमुळे नद्या, तलाव व विहिरींचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होते. यावर मात करण्यासाठी नैसर्गिक शाडू माती किंवा लाल मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. विसर्जनाच्या वेळी प्रशासनाकडून राबवण्यात येणाऱ्या ‘मूर्तीदान’ उपक्रमाला मंडळे व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे.
याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पुढाकार संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. कोल्हापूरमध्ये लाखो गणेशमूर्तींचे संकलन करून आणि शेकडो टन निर्माल्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करून निसर्गाचा समतोल राखला जात आहे.
तीव्र डीजे आणि घातक लेझर किरणांना फाटा द्या!
गेल्या काही वर्षांत उत्सवात डीजे आणि अतितीव्र लेझर लाईट्सचा अवाजवी वापर वाढला आहे. याचा थेट फटका लहान बालके, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि हृदयविकाराच्या रुग्णांना बसत आहे. लेझरमुळे डोळ्यांच्या दृष्टीवर गंभीर परिणाम झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
- पारंपरिक वाद्यांना प्राधान्य: ढोल-ताशा पथके, लेझीम, झांज आणि स्थानिक लोककलांच्या सादरीकरणाने उत्सवाचा पारंपरिक डौल वाढवा.
- स्थानिक कलाकारांना रोजगार: पारंपरिक लोककलांचा वापर केल्यास ग्रामीण व स्थानिक कलाकारांना सन्मान आणि रोजगाराच्या नव्या संधी मिळतील.
- आरोग्याची सुरक्षितता: ध्वनी आणि प्रकाशाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करून इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे हेच खऱ्या अर्थाने देवकार्य आहे.
तरुणाईने जपायला हवे भवितव्य
उत्सवाच्या भरात नियमांचे उल्लंघन करणे, हुल्लडबाजी किंवा सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे तरुणांच्या अंगलट येऊ शकते. पोलिसांत एखादा गुन्हा दाखल झाल्यास भविष्यातील नोकरी, पासपोर्ट पडताळणी किंवा उच्च शिक्षणात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे एका दिवसाच्या चुकीच्या उत्साहापायी आपले उज्ज्वल भविष्य धोक्यात घालू नका, असा संदेश पोलिस प्रशासनाकडून दिला जात आहे.
सध्या सणासुदीच्या काळात प्रशासकीय यंत्रणांनी चोख नियोजन केले असून गणेशोत्सवात गैरसोय टाळण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी स्वयंसेवक, प्रथमोपचार आणि मदत कक्षांची उभारणी करून प्रशासनाला सहकार्य करावे.
‘माझा गणपती – माझी सामाजिक जबाबदारी’
गणेशोत्सवाच्या सजावटीमधून आणि देखाव्यांतून समाजप्रबोधन घडून यायला हवे. पाणीबचत, स्वच्छता, वृक्षारोपण, अवयवदान, सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्ती यांसारख्या सामाजिक विषयांवर प्रकाश टाकून आपण समाजाला नवी दिशा देऊ शकतो. बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत मंडप परिसर प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा.
यावर्षीचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक अनुष्ठान न राहता, पर्यावरणाचे रक्षण करणारा आणि समृद्ध संस्कृतीचा गौरव वाढवणारा एक लोकजागर ठरो, हीच विघ्नहर्त्या चरणी प्रार्थना!