नवी दिल्ली: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पार पडणाऱ्या आगामी भव्य सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्याने होत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र पर्वाच्या ध्वजारोहण सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची सदिच्छा भेट घेऊन त्यांना हे आदरपूर्वक निमंत्रण सुपूर्द केले.
या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
विविध उपक्रमांचे आणि लोकार्पणाचे निमंत्रण
३१ ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहण सोहळा संपन्न होणार आहे. या दिवशी केवळ ध्वजारोहणच नव्हे, तर अनेक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे. राष्ट्रपतींना ध्वजारोहणासह पुढील प्रमुख कार्यक्रमांसाठीही निमंत्रित करण्यात आले आहे:
- पवित्र गोदावरी मातेची महाआरती (गोदा आरती).
- नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन.
- कुंभमेळा विशेष गीताचे भव्य लोकार्पण.
- कुंभमेळ्याचा वारसा आणि इतिहास मांडणाऱ्या ‘कॉफीटेबल बुक’चे प्रकाशन.
- विशेष कुंभमेळा टपाल तिकिटाचे (Postal Stamp) अनावरण.
दरम्यान, राष्ट्रपती भवनात यापूर्वीही महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची दखल घेण्यात आली असून ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राचा डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातील तीन कलाकारांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. त्याच परंपरेला साजेसे असे कलात्मक सादरीकरण या निमंत्रण सोहळ्यातही दिसून आले.
पंचेंद्रियांना साद घालणारे अनोखे ‘कलात्मक निमंत्रण’
राष्ट्रपतींना देण्यात आलेली निमंत्रण पत्रिका अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पक पद्धतीने तयार करण्यात आली आहे. निमंत्रण पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, त्र्यंबकेश्वर देवस्थान, गोदावरी नदी आणि कुंभमेळ्याची भव्यता दर्शवणारी एक सुंदर त्रिमितीय (3D Pop-up) कलाकृती उलगडते. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांना साद घालणाऱ्या घटकांचा यात समावेश असून, त्याद्वारे नाशिकच्या समृद्ध संस्कृतीची झलक सादर करण्यात आली आहे.
आदिवासी उद्योजकता आणि कृषिसमृद्धीची अनोखी भेट
या भेटीदरम्यान राष्ट्रपतींना महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि कृषी संस्कृतीचे दर्शन घडवणारा एक विशेष भेटवस्तू संच प्रदान करण्यात आला:
- शबरी नॅचरल्सची उत्पादने: आदिवासी विकास विभागाच्या शबरी नॅचरल्स अंतर्गत तयार करण्यात आलेली अगरबत्ती, बांबूच्या हस्तकला वस्तू, वनमध, मोहफुलांची उत्पादने आणि पोषक भरडधान्यांचे खाद्यपदार्थ यात समाविष्ट आहेत. स्थानिक आदिवासी कारागिरांचे कौशल्य आणि पारंपरिक ज्ञानाचा हा अनोखा गौरव आहे. राज्य शासन सध्या ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी राज्य शासनाचा मोठा पुढाकार घेत असून, अशा उत्पादनांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा मानस आहे.
- येवला पैठणी: महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचे भूषण आणि जागतिक ओळख असलेली येवल्याची अस्सल पैठणी साडी राष्ट्रपतींना भेट देण्यात आली.
- कृषी व खाद्य संस्कृती: द्राक्षांची पंढरी मानल्या जाणाऱ्या नाशिकच्या कृषिसमृद्धीचे प्रतीक म्हणून काळे मनुके आणि काजू, तसेच खाद्यसंस्कृतीची ओळख असलेला जगप्रसिद्ध नाशिकचा चिवडा आणि पारंपरिक सुकामेवा या भेट संचात देण्यात आला.
या ऐतिहासिक भेटीवेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्यासह पुरोहित संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता वेग आला असून, ३१ ऑक्टोबरचा सोहळा देशभरातील भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.