हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यानंतरचा प्रत्येक सेकंद रुग्णाच्या आयुष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरतो. वैद्यकीय भाषेत ज्याला ‘गोल्डन अवर’ (Golden Hour) म्हटले जाते, त्या पहिल्या एका तासात जर अचूक निदान आणि योग्य उपचार मिळाले, तर रुग्णाचा जीव निश्चितपणे वाचू शकतो. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना हृदयविकारावर वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेला ‘स्टेमी महाराष्ट्र’ (STEMI Maharashtra) प्रकल्प खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे.
आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणामुळे राज्य सातत्याने प्रगती करत असून, विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात नवा आदर्श निर्माण करेल हा विश्वास अशा लोकोपयोगी आरोग्य योजनांमुळे सार्थ ठरताना दिसत आहे.
काय आहे ‘स्टेमी’ (STEMI) आजार?
STEMI म्हणजे ST Elevation Myocardial Infarction. हा हृदयविकाराच्या झटक्यातील अत्यंत धोकादायक व गंभीर प्रकार मानला जातो. जेव्हा हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अचानक अडथळा निर्माण होतो आणि हृदयाच्या स्नायूंना रक्त व ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो, तेव्हा तीव्र हृदयविकाराचा झटका येतो. अशा वेळी जितक्या लवकर रक्ताची गुठळी विरघळवून रक्तप्रवाह पूर्ववत केला जाईल, तितका हृदयाच्या स्नायूंचे नुकसान टळू शकते.
३४ जिल्ह्यांत पसरले ‘हब अँड स्पोक’ मॉडेलचे जाळे
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर १२ जिल्ह्यांत सुरू झालेला हा उपक्रम आता महाराष्ट्रातील तब्बल ३४ जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित झाला आहे. या अंतर्गत त्रिस्तरीय आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे:
- २,४१५ स्पोक केंद्रे: प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC), ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक ईसीजी (ECG) मशिन्स उपलब्ध करून दिल्या आहेत.
- ९९ हब रुग्णालये: अत्याधुनिक कॅथलॅब (Cath Lab), अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रियेची सोय असलेली मोठी शासकीय व धर्मादाय रुग्णालये या नेटवर्कशी जोडण्यात आली आहेत.
- १०८ रुग्णवाहिका: रुग्णाला स्पोक सेंटरमधून प्राथमिक उपचारांनंतर त्वरित हब रुग्णालयात हलवण्यासाठी २४ तास मोफत आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा सज्ज असते.
तसेच, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांवर या आजारावर मोफत उपचार केले जात असल्याने गरीब व सामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी झाला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अवघ्या १० मिनिटांत निदान!
आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून क्रांती घडवून आणली जात आहे. ज्याप्रमाणे विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर वाढतो आहे, अगदी त्याच धर्तीवर स्टेमी प्रकल्पात बंगळुरूस्थित ‘ट्रायकॉग हेल्थ’च्या सहकार्याने प्रगत AI तंत्रज्ञान वापरले जात आहे.
ग्रामीण भागातील रुग्णालयात रुग्णाचा ईसीजी काढल्याबरोबर तो क्लाऊडवर अपलोड होतो. प्रगत एआय अल्गोरिदम आणि तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्ट्स अवघ्या १० मिनिटांत या ईसीजीचे विश्लेषण करून अचूक अहवाल स्थानिक डॉक्टरांना पाठवतात. यामुळे तातडीने ‘थ्रोम्बोलायसिस’ (रक्ताची गाठ विरघळवणारे इंजेक्शन) देणे शक्य होते.
५० लाखांहून अधिक तपासण्या; हजारो रुग्णांना नवजीवन
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत तब्बल ५० लाखांहून अधिक ईसीजी तपासण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. त्यातून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त गंभीर ‘स्टेमी’ रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे, तर १ लाख ४५ हजार इतर गंभीर हृदयविकाराचे वेळेवर निदान झाले आहे.
हृदयविकाराची प्रमुख लक्षणे दुर्लक्षित करू नका:
- छातीत तीव्र वेदना होणे किंवा छातीवर जडपणा/दडपण जाणवणे
- वेदना डाव्या हाताकडे, मानेकडे, खांद्याकडे किंवा जबड्याकडे पसरणे
- श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे
- विनाकारण अचानक थंड घाम सुटणे किंवा चक्कर येणे
- मळमळ, उलट्या किंवा तीव्र अस्वस्थता जाणवणे
मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, तंबाखूचे व्यसन आणि मानसिक ताण असलेल्या व्यक्तींनी अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास घरगुती उपचारात वेळ न घालवता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्वरित ईसीजी करून घेणे आवश्यक आहे. हृदयाचा प्रत्येक ठोका अमूल्य असून वेळेवर घेतलेला निर्णय जीव वाचवू शकतो.