महाराष्ट्राचा लाडका सण असलेल्या गणेशोत्सवाच्या अनोख्या आणि प्रेरणादायी आठवणींचे डिजिटल जतन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘घरोघरी बाप्पा’ या उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या Bappa.org या डिजिटल सांस्कृतिक पोर्टलवर आज पाच अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि हृदयस्पर्शी गणेशोत्सव कथांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव, कोकणातील शतकानुशतके चालत आलेली परंपरा, परदेशातील भारतीय संस्कृतीचे दर्शन आणि विसर्जनाच्या मातीतून वृक्षसंवर्धन यांसारख्या आदर्श उपक्रमांचा गौरव करण्यात आला आहे. राज्यात पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या विविध मोहिमांप्रमाणेच, जसे की मुंबईत सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण व पर्यावरणपूरक कामांना प्राधान्य दिले जात आहे, तसेच काम या गणेशोत्सवाच्या माध्यमातूनही होताना दिसत आहे.
निवड झालेल्या पाच वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव कथा
१. गुहागरची निसर्गाशी नाळ जोडणारी पारंपरिक गौरी-गणपती प्रथा
कोकणातील गुहागर येथे शतकानुशतके चालत आलेली परंपरा आजही तितक्याच भक्तीभावाने जपली जात आहे. महिला डोक्यावर पितळी ताटात गौरीची मूर्ती, पूजेचे नारळ आणि रानातील तेरड्याचे देठ घेऊन शेतातून व गावातील पाणवाटांमधून एकत्र मार्गक्रमण करतात. शेती, निसर्ग, पूर्वजांची परंपरा आणि स्त्रीशक्तीचा अनोखा संगम साधणाऱ्या या परंपरेची पोर्टलवर विशेष निवड झाली आहे.
२. घरच्या घरी साकारलेली पर्यावरणपूरक मातीची मूर्ती
निकिता जे. पांचाळ यांनी बाजारातील प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) आणि रासायनिक रंगांचा वापर पूर्णपणे नाकारत, कच्च्या मातीपासून स्वतःच्या हाताने सुरेख बाप्पाची मूर्ती घडवली. मूर्तीला नैसर्गिक व सुरक्षित रंगांनी सजवून त्यांनी पारंपारिक मातीकलेचा वारसा जपत समाजापुढे पर्यावरणस्नेही उत्सवाचा आदर्श ठेवला आहे.
३. पुण्यातील नव्या घरातील पहिलाच मंगलमय गणेशोत्सव
दरवर्षी सणासाठी मूळ गावी जाणाऱ्या संजय मंगलाराम यांच्या कुटुंबाने यंदा पुण्यातील आपल्या नव्या घरात पहिल्यांदाच बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. घरातील दोन लहान मुलींनी पूजा-अर्चा आणि दैनंदिन आरतीची धुरा सांभाळत परंपरेचा हा वारसा नव्या पिढीत कसा रुजतो, याचे सुंदर उदाहरण सादर केले.
४. व्हिएतनाममध्ये परदेशी भूमीवर विद्यार्थ्यांनी जपली संस्कृती
शिक्षणासाठी महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर व्हिएतनाममध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी एकत्र येत गणेश चतुर्थी साजरी केली. उत्सवाचे साहित्य सहज उपलब्ध नसतानाही विद्यार्थ्यांनी स्वतः पारंपरिक मोदक तयार केले आणि स्थानिक मित्रांनाही उत्सवाचा आनंद दिला. ईश्वर बोरसे यांनी नोंदवलेली ही कथा परदेशातही आपली संस्कृती जिवंत ठेवण्याची साक्ष देते. अशा प्रकारे महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा आणि परंपरा सातासमुद्रापार नेण्याचे काम या तरुणाईने केले आहे.
५. विसर्जनाच्या मातीतून ३० हून अधिक वृक्षांची निर्मिती
पराग नारायण शेठ गुजराथी यांच्या कुटुंबात गेल्या ६५ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मागील सहा वर्षांपासून हे कुटुंब मातीच्या मूर्तीचे विसर्जन घराच्या गच्चीवरच कुंडीत करते. त्या विसर्जित मातीमध्ये विविध रोपे लावून ती पाच फुटांपर्यंत मोठी होईपर्यंत त्यांची निगा राखली जाते. त्यानंतर ही झाडे नदीकाठ व डोंगरमाथ्यावर लावली जातात. या अनोख्या उपक्रमातून त्यांनी आतापर्यंत ३० हून अधिक मोठी झाडे निसर्गाला बहाल केली आहेत.
सहभागी व्हा आणि मिळवा शासकीय ‘डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र’
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने सर्वसामान्य नागरिक, गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मंदिर न्यासांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे:
- नागरिकांनी Bappa.org या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.
- आपल्या घरातील अथवा मंडळातील गणेशमूर्ती, सजावट आणि सामाजिक किंवा पर्यावरणपूरक उपक्रमाचे छायाचित्र व थोडक्यात माहिती अपलोड करावी.
- माहिती सादर करणाऱ्या प्रत्येक सहभागास महाराष्ट्र शासनाचे अधिकृत ‘डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र’ प्रदान केले जाईल.
दररोज प्राप्त होणाऱ्या सर्वोत्तम नोंदींमधून पाच प्रेरणादायी कथांची निवड करून त्यांना शासनाच्या अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी देण्यात येत आहे.