MPSC Exam Process Reforms: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कामकाजात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि गतिमानता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण रचनात्मक आणि गुणात्मक बदल करण्यात आले आहेत. आयोगाच्या परीक्षा तसेच भरती प्रक्रियेत सुसूत्रता आणून उमेदवारांना जलद सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले आहे.
८४ चाळणी परीक्षा यशस्वी; १८ ते २१ दिवसांत निकाल शक्य
अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच्या कामकाजाचा आढावा देताना विवेक भीमनवार यांनी सांगितले की, पदभार स्वीकारल्यापासून स्पर्धा परीक्षांच्या ८ आणि सरळसेवा भरतीच्या ७६ अशा मिळून एकूण ८४ चाळणी परीक्षा यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.
शासनाकडून भरतीची मागणी आल्यापासून ते थेट अंतिम निकाल जाहीर होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कार्यपद्धतीतील सुधारणांमुळे आता अवघ्या १८ ते २१ दिवसांत निकाल जाहीर करणे शक्य झाले असून, निकालासाठी लागणारा प्रदीर्घ वेळ कमी करून सर्व निकाल एका महिन्याच्या आत जाहीर करण्याचे नियोजन एमपीएससीने आखले आहे.
राज्यातील नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासन पातळीवरही अनेक पावले उचलली जात असून, नुकतेच महाराष्ट्र शासन भरती परीक्षांमध्ये मोठे बदल: गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी आरोपांवर स्पष्टीकरण
गेल्या काही दिवसांपासून औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सुरू असलेल्या आरोपांवरही अध्यक्षांनी सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले, “प्रश्नपत्रिका फुटीचा हा घटनाक्रम मी आयोगाच्या अध्यक्षपदावर रुजू होण्यापूर्वीचा आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच तातडीने पोलिसांत अधिकृत फिर्याद नोंदवण्यात आली असून तपास सुरू आहे.”
भविष्यात अशा गैरप्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एमपीएससीने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. तसेच विभागीय पातळीवर विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शकांशी थेट संवाद साधून सल्लामसलत केली जात आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्राशी संबंधित अनेक घडामोडी सुरू असतानाच शासनाने खासगी कोचिंग क्लासेस नियमन कायद्याचा मसुदा: सूचना व हरकती नोंदवण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, ज्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या संपूर्ण व्यवस्थेत शिस्त येण्यास मदत होईल.
विद्यार्थ्यांच्या कष्टाचे यथोचित फळ मिळणे हाच उद्देश
विवेक भीमनवार यांनी एमपीएससीच्या विश्वासार्हतेवर भर देताना सांगितले की, “आयोगाची प्रतिष्ठा जपणे आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या कष्टाला न्याय मिळवून देणे हाच आमचा मूळ हेतू आहे. निष्पक्ष व पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील. माझ्याविरुद्ध गैरव्यवहाराचा एक जरी ठोस पुरावा दिला, तरी मी एका क्षणात पदाचा त्याग करेन,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.