मुंबई: महाराष्ट्रात मान्सून अत्यंत सक्रिय झाला असून राज्यभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची आणि समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील सर्व आपत्कालीन यंत्रणांना २४ तास म्हणजेच २४ बाय ७ ‘अलर्ट मोड’वर राहण्याचे थेट निर्देश दिले आहेत.
तसेच, पुढील दोन दिवस अतिशय महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
सर्व आपत्कालीन यंत्रणा २४ तास ‘अलर्ट मोड’वर
हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मुंबई आणि लगतच्या किनारपट्टीच्या भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. समुद्रातील संभाव्य उच्च भरती (High Tide) लक्षात घेऊन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पथकांना तैनात ठेवण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तत्पर राहणे आवश्यक आहे. पूर आणि इतर संकटाच्या काळात मदतीसाठी सरकारने विशेष दूरध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत, त्याची माहिती तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी धावून येणार ‘हे’ हेल्पलाईन क्रमांक या लेखात पाहू शकता.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसदृश पावसाचा इशारा
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्ह्यात आणि विशेषतः त्र्यंबकेश्वर व आसपासच्या परिसरात ढगफुटीसदृश (जवळपास ३०० मिमी) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरडी कोसळण्याची ठिकाणे आणि संवेदनशील रस्ते तात्काळ बंद करून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पर्यटकांनी पुढील काही दिवस या भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी देखील सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा हाहाकार उडालेला असताना प्रशासनाने अशीच कडक पावले उचलली होती. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.
महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आदेश
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या महामार्गावरील मलबा युद्धपातळीवर हटवून वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) देण्यात आले आहेत. तसेच, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Expressway) दरडी आणि माती काढण्याचे कामही वेगाने सुरू आहे.
मुंबईत अवघ्या ४ दिवसांत महिन्याभराचा पाऊस!
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबईत अवघ्या चार दिवसांत संपूर्ण महिन्याच्या सरासरीइतका पाऊस झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली आहेत. साधारणपणे संपूर्ण चार महिन्यांत जितकी झाडे पडतात, त्यापैकी जवळपास ३०० झाडे मुंबईत एकाच दिवसात कोसळली आहेत. पुढील ३ दिवस म्हणजेच ८ जुलैच्या रात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.
खाजगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे आदेश
पावसाची बिकट परिस्थिती पाहता खाजगी कंपन्या आणि आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) ची सवलत द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. तसेच, ज्या कंपन्या ही सवलत देणार नाहीत आणि कर्मचाऱ्यांना सक्तीने कार्यालयात बोलवतील, अशा आस्थापनांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी (६ जुलै सकाळी ११ वाजेपर्यंत):
- मुंबई उपनगर: १५१.२ मिलिमीटर
- मुंबई शहर: १०५ मिलिमीटर
- रायगड जिल्हा: २३६.६ मिलिमीटर
- ठाणे जिल्हा: १५८.७ मिलिमीटर
- रत्नागिरी जिल्हा: १५२.३ मिलिमीटर