शेतकरी हा आपल्या राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. मात्र, वारंवार येणारी नैसर्गिक संकटे जसे की दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे राज्यातील शेतकरी सातत्याने आर्थिक विळख्यात अडकतो. या संकटग्रस्त बळीराजाला दिलासा देण्यासाठी आणि त्याला पुन्हा एकदा शेतीसाठी सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शासनाने राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने योजनेचा सन्मान
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक अत्यंत कुशल प्रशासक आणि लोककल्याणकारी शासक होत्या. त्यांनी शेती, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलेले योगदान आजही मार्गदर्शक मानले जाते. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी शेतकरी कर्जमुक्ती योजनेला त्यांचे नाव दिले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी शासन विविध योजना राबवत असते, ज्यामध्ये सौर कृषी पंप योजना आणि सिंचन योजनांचा समावेश आहे.
यापूर्वी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ आणि महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत दिली आहे. तसेच, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नुकतेच वसंतराव नाईक कृषी पुरस्कार २०२६ देखील जाहीर करण्यात आले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना नेमकी काय आहे?
या नवीन कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे महत्त्वाचे लाभ मिळणार आहेत:
- २ लाखांपर्यंत कर्जमाफी: शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे थकीत पीक कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल. यामध्ये पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जाचाही समावेश आहे.
- एकवेळ समझोता योजना (One Time Settlement – OTS): पूर्वी ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाख रुपयांपेक्षा थोडेही जास्त असायचे, त्यांना योजनेचा लाभ मिळत नव्हता. मात्र, नवीन नियमानुसार शेतकऱ्याने २ लाखांवरील अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यास, उर्वरित २ लाख रुपयांची रक्कम शासन भरणार आहे. ही अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत दिली जाईल.
- जमीन धारणेची अट नाही: या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे किती शेतजमीन आहे, यावर कोणतीही अट असणार नाही.
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांचे प्रोत्साहन!
प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने त्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी ५० हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल.
तसेच, ज्या शेतकऱ्यांची परतफेडीची रक्कम ५० हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान ५,००० रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.
योजनेचे मुख्य निकष आणि अटी
- १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी ही योजना लागू राहील.
- ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जाचा यामध्ये समावेश असेल.
- लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करणे बंधनकारक आहे.
- ही योजना राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (PACS) यांच्याकडून घेतलेल्या कर्जासाठी लागू असेल.
योजनेसाठी कोण अपात्र ठरेल? (Apatrata Nikash)
पुढील व्यक्तींना या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार नाही:
- विद्यमान किंवा माजी मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी.
- केंद्र किंवा राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचारी (मासिक वेतन २५ हजारांपेक्षा जास्त असलेले).
- सरकारी उपक्रमांमधील (उदा. महावितरण, एसटी महामंडळ) २५ हजारांपेक्षा जास्त पगार असलेले कर्मचारी.
- शेतीव्यतिरिक्त इतर उत्पन्नावर आयकर (Income Tax) भरणारे नागरिक.
- २५ हजारांपेक्षा जास्त मासिक पेन्शन घेणारे निवृत्तीवेतनधारक (माजी सैनिकांना हा अपवाद लागू नाही).
- सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, जिल्हा बँकांचे संचालक व पदाधिकारी. (मात्र, साखर कारखान्यांतील हंगामी कामगार या योजनेसाठी पात्र राहतील).
५६ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा!
या ऐतिहासिक कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. या योजनेचा फायदा राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना होणार असून, यासाठी शासनाकडून तब्बल ३६ हजार ५०० कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरणार असून, यामुळे बळीराजाचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास नक्कीच वाढेल!